मंत्री गुलाबराव पाटलांच्या मुलाचे थेट ‘भावी आमदार’ म्हणून बॅनर झळकले; विधान परिषदेसाठी शड्डू ठोकले?

जळगाव (विशेष प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका बॅनरने मोठी खळबळ उडवून दिली आहे. राज्य मंत्रिमंडळातील शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात चक्क ‘भावी आमदार’ अशा आशयाचे होर्डिंग्ज लागले आहेत. या बॅनरबाजीमुळे गुलाबराव पाटलांचे राजकीय वारसदार आता अधिकृतपणे निवडणूक मैदानात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
आकाशवाणी चौकात समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
येत्या २८ एप्रिल रोजी प्रतापराव पाटील यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच जळगावातील गजबजलेल्या आकाशवाणी चौकासह शहराच्या मोक्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी हे लक्षवेधी बॅनर लावले आहेत. “आमचा दादा… भावी आमदार प्रतापराव पाटील” अशा ठळक शब्दांत लावण्यात आलेल्या या बॅनर्सनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने समर्थकांनी केलेले हे एक प्रकारचे राजकीय शक्तिप्रदर्शनच मानले जात आहे.
विधान परिषदेसाठी महायुतीत रस्सीखेच; प्रतापराव आघाडीवर?
हे बॅनर केवळ कार्यकर्त्यांच्या उत्साहापोटी लागलेले नाहीत, तर यामागे आगामी राजकीय गणिते दडली असल्याचे जाणकारांचे मत आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या जागेवर दावा सांगण्यासाठी महायुतीमध्ये (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी) मोठी अंतर्गत रस्सीखेच सुरू आहे. अशातच, या महत्त्वपूर्ण जागेसाठी शिवसेनेकडून (शिंदे गट) प्रतापराव पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे हे ‘भावी आमदार’चे बॅनर म्हणजे विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी समर्थकांनी ठोकलेला शड्डूच मानला जात आहे.
”आमदाराच्या पोराने आमदार होणं गैर नाही…”
विशेष म्हणजे, या बॅनरबाजीला मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका जुन्या विधानाची जोड मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच गुलाबराव पाटील यांनी “आमदाराच्या पोराने आमदार होणं यात काहीच गैर नाही,” असे अत्यंत सूचक आणि स्पष्ट वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतरच प्रतापरावांच्या राजकीय ‘लॉन्चिंग’ची तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता वाढदिवसाच्या निमित्ताने झळकलेल्या या बॅनर्सनी मंत्र्यांच्या त्या विधानाला एक प्रकारे कृतीत उतरवल्याचे दिसत आहे.
राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण
प्रतापराव पाटील यांच्या या ‘भावी आमदार’च्या बॅनरमुळे जळगावच्या स्थानिक राजकारणात आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महायुतीतील मित्रपक्ष, विशेषतः भाजप, या बॅनरबाजीकडे आणि शिवसेनेच्या या दाव्याकडे कसे पाहणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुलाबराव पाटलांच्या पारड्यात वजन टाकून त्यांच्या चिरंजीवांना विधान परिषदेची लॉटरी लावणार का? हे पाहणे आता अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे.
तूर्तास तरी, जळगावच्या रणरणत्या उन्हात प्रतापराव पाटलांच्या या वाढदिवसाच्या बॅनरने जिल्ह्याचे राजकीय तापमान मात्र चांगलेच वाढवले आहे.



