जळगावात वाळू माफियांवर पोलिसांची ‘सर्जिकल स्ट्राईक’ ८ वाहनांसह ५५ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त; पहाटेच्या कारवाईने माफियांमध्ये खळबळ

जळगाव, दि. २६ (प्रतिनिधी): जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या माफियांविरुद्ध जळगाव पोलीस दलाने धडक मोहीम उघडली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली सलग दोन दिवस राबविण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ५५ लाख रुपये किमतीची ८ वाहने आणि ४२ हजार रुपयांची वाळू असा एकूण ५५ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर २४ एप्रिल रोजी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी, २५ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या धडक मोहिमेत अवैध वाळूने भरलेली एकूण ८ वाहने रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले.
याप्रकरणी संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) सह मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १३०(१) आणि १७७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोठी कारवाई
ही कारवाई प्रामुख्याने धरणगाव, जळगाव तालुका आणि एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. जळगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांनी एम.आय.डी.सी. पोलिसांच्या पथकासोबत संयुक्त कारवाई करत ३ डंपर जप्त केले आहेत.
जप्त मुद्देमालाचा तपशील:
- धरणगाव पोलीस ठाणे: ३ ट्रॅक्टर (किंमत १२ लाख) आणि १२ हजार रुपयांची वाळू.
- जळगाव तालुका पोलीस ठाणे: २ डंपर (किंमत १५ लाख) आणि ८ हजार रुपयांची वाळू.
- एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे: ३ डंपर (किंमत २८ लाख) आणि २२ हजार रुपयांची वाळू.
’चोरी करणाऱ्यांवर कारवाई निरंतर सुरू राहील’
जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्तीची राजरोसपणे होणारी चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी आता कायद्याचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. यापुढेही बेकायदेशीर वाळू वाहतूक व खनिजांची चोरी करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई निरंतर सुरू राहील, असा स्पष्ट इशारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगाव परिमंडळाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि जळगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली.



