जळगाव बसस्थानकावर ‘शनिदोषा’ची भीती दाखवून वृद्धांना लुटणारी भामट्यांची टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शेगावच्या बसची विचारपूस करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून, ‘हातचालाखीने खड्याचा रुद्राक्ष’ तयार करून आणि ‘शनिदोष’ असल्याची भीती दाखवून त्यांना लुटणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन सराईत भामट्यांना बेड्या ठोकल्या असून, त्यांचा एक साथीदार फरार आहे.

नेमकी घटना काय घडली?
दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गजानन विठोबा सर्जेराव (वय ६५, रा. जिल्हा बँक कॉलनी, जळगाव) हे जळगाव बसस्थानक येथे उभे होते. त्यावेळी एक अज्ञात इसम त्यांच्याजवळ आला आणि त्याने शेगाव बसबाबत विचारणा करत त्यांना बोलण्यात गुंतवले. त्याचवेळी त्याचा दुसरा साथीदार तिथे आला. त्यांनी हातचालाखी करून एका साध्या खड्याचा रुद्राक्ष बनवून दाखवला आणि गजानन सर्जेराव यांना बसस्थानकाच्या एका कोपऱ्यात नेले.
तेथे “तुमच्या मागे शनिदोष आहे, तो आम्ही काढून देतो,” अशा भुलथापा देत या भामट्यांनी सर्जेराव यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम काढून घेतली व पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गजानन सर्जेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांचा तपास आणि आरोपींना अटक
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या.
पो.नि. गायकवाड यांनी वेगवेगळी पथके तयार करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. यादरम्यान, गुन्ह्यातील संशयित आरोपी हे पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले:
१) अल्ताफ हसन मदारी (वय ३२, रा. निपाणी रोड, वखार जवळ, नगरदेवळा, ता. पाचोरा, जि. जळगाव)
२) मोहसीन जब्बार मदारी (वय ३१, रा. झोपडपट्टी, पाण्याच्या टाकीजवळ, नागद रोड, चाळीसगाव, जि. जळगाव)
पोलिसी खाक्या दाखवताच या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात त्यांचा सद्दाम मदारी हा साथीदार देखील सामील असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पुढील तपासकामी अटक केलेल्या आरोपींना जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदिप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उप-निरीक्षक सोपान गोरे, शरद बागल आणि त्यांच्या पथकातील अंमलदार अतुल वंजारी, विजय पाटील, अकरम शेख, नितीन वाविस्कर, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, प्रदीप सपकाळे, मिलींद जाधव, गौरव पाटील तसेच पाचोरा पो.स्टे. चे दिनेश पाटील, जळगाव RPF चे पंकज वाघ आणि नेत्रम चे मुबारख देशमुख, पंकज खडसे, कुंदनसिंग वयास यांनी केली आहे.



