दुष्काळात शेतकरीहिताच्या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील • शेळगाव येथे ७५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी शासनस्तरावर प्रयत्न; DPDC मधून जलसंधारण, चारा व शेतरस्त्यांना प्राधान्य

पाळधी/जळगाव : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत बळीराजाला दिलासा देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून, दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनस्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा नियोजन निधीतून (DPDC) जलसंधारण, चारा उपलब्धता आणि शेतरस्त्यांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

शेळगाव (ता. जळगाव) येथे जय मरिमाता मंदिराच्या कळसाचे पूजन तसेच तब्बल ७५ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “जनतेशी सतत थेट संपर्क, सुख-दुःखात खंबीर सहभाग आणि प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हीच माझ्या कामाची त्रिसूत्री राहिली आहे. जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझ्या आयुष्यातील खरी शिदोरी आहे.” मतदारसंघातील प्रत्येक गावात मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी काँक्रिटीकरण, डांबरीकरण आणि शेतरस्त्यांची कामे मार्गी लावण्यात आली असून शेळगावच्या पुढील विकासातही निधीचा तुटवडा जाणवणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या संकटाच्या काळात पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यासोबतच सर्वसामान्य शेतकरी व शेतमजुरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन करत त्यांनी उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
७५ लाखांच्या या कामांचे झाले भूमिपूजन
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते एकूण ७५ लाख रुपयांच्या पाच प्रमुख विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. यामध्ये प्रामुख्याने:
- बसस्थानकाजवळील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण – ₹२० लाख
- सुसज्ज व्यायामशाळा बांधकाम – ₹२० लाख
- गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण – ₹१० लाख
- श्री विठ्ठल मंदिर सभामंडप बांधकाम – ₹१५ लाख
- मुख्य रस्त्यावर पथदिवे (स्ट्रीट लाईट्स) बसविणे – ₹१० लाख
मान्यवरांकडून पालकमंत्र्यांच्या विकासकार्याचा गौरव
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पालकमंत्र्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नशिराबाद व परिसरातील गावांना बंदिस्त पाईपलाईन योजनेचा मोठा लाभ झाला असून यामुळे परिसरातील भूजल पातळी टिकून राहण्यास मदत झाली आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी गेल्या तीन-चार वर्षांत नशिराबाद परिसराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी यांनी शेवटच्या घटकापर्यंत आणि वाड्या-वस्त्यांपर्यंत विकासगंगा पोहोचवल्याबद्दल गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला.
प्रास्ताविकात युवा नेते तथा माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी शेळगावसह मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पालकमंत्री सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोहळ्यास ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
कार्यक्रमास युवा नेते तथा माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, नशिराबादचे प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, पवन सोनवणे, शेळगावचे माजी सरपंच गणेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख शिवराज पाटील, दूध संघाचे संचालक रमेश आप्पा पाटील, भाजपचे मिलिंद चौधरी, संजय सोनवणे, हरीष सोनवणे, सत्यवान तायडे, ज्ञानेश्वर सोनवणे, मनोज पाटील, भूषण पाटील, बाळू कोळी, गोपाल कोळी, मुरलीधर पाटील, भानुदास पाटील, गिरीश भोळे, बापू महाजन, तुषार महाजन, किशोर चौधरी, जीवन सोनवणे, हरीष भोळे, अनिल कोळी, ललित कोळी, लखण जोहरे, राजू सोनवणे, मुकेश सोनवणे, जितू पाटील यांच्यासह शेळगाव व परिसरातील ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन हितेश नारखेडे यांनी केले.



