हैदराबादहून अंतराळ संशोधनासाठी बलून उड्डाणे: जळगावसह महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांत उपकरणे पडण्याची शक्यता
नागरिकांना सतर्क राहण्याचे, उपकरणांना स्पर्श न करण्याचे आवाहन; सुरक्षित परतफेड करणाऱ्यांना बक्षीस

जळगाव, दि. २८ ऑक्टोबर, २०२५: भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक संशोधनासाठी महत्त्वाकांक्षी ‘बलून उड्डाण’ कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. येत्या २५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत, हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), ईसीआयएल (ECIL) येथील बलून सुविधा केंद्रातून सुमारे १० उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून आकाशात सोडले जाणार आहेत.
१९५९ पासूनची परंपरा:
महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने १९५९ सालापासून ही बलून उड्डाणे आयोजित केली जात आहेत आणि यंदाही त्याच परंपरेत हे महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोग पार पडणार आहेत. संशोधनासाठी वापरले जाणारे हे बलून हायड्रोजन वायूने भरलेले असून, त्यांचा व्यास ५० ते ८५ मीटर इतका मोठा असतो. ही बलून ३० ते ४२ किलोमीटर उंचीवर वैज्ञानिक उपकरणे घेऊन जातात. काही तासांच्या प्रयोगानंतर ही उपकरणे रंगीत पॅराशूटच्या सहाय्याने हळूवारपणे जमिनीवर उतरतात.
जळगावसह १३ जिल्ह्यांत उपकरणे पडण्याची शक्यता:
वाऱ्याची दिशा आणि प्रयोगाची रूपरेषा यानुसार, ही उपकरणे हैदराबादपासून सुमारे २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रदेशात पडण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, अहमदनगर, नागपूर, जळगाव, सोलापूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या १३ जिल्ह्यांचा समावेश आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना:
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (TIFR) संबंधित जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि खालील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे:
१. स्पर्श करू नका: जर कोणत्याही नागरिकाला अशी उपकरणे किंवा पॅराशूट आढळल्यास, त्यांनी ती उघडू (डीसमेंटल) नयेत किंवा जागेवरून हलवू नयेत.
२. वैज्ञानिक माहितीचे नुकसान: उपकरणांशी छेडछाड केल्यास मौल्यवान वैज्ञानिक माहिती नष्ट होऊ शकते.
३. विद्युत धक्क्याचा धोका: काही उपकरणांवर उच्च विद्युत दाब (हाय व्होल्टेज) असू शकतो. त्यामुळे ती हाताळणे धोकादायक ठरू शकते.
४. त्वरित संपर्क साधा: अशी वस्तू आढळल्यास, नागरिकांनी तात्काळ जवळचे पोलिस ठाणे, पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.
बक्षीस आणि सुरक्षित परतफेड:
उपकरणे आढळल्यास, नागरिक खालील पत्त्यावर फोन किंवा संदेशाद्वारे देखील संपर्क साधू शकतात:
* संचालक, बलून सुविधा केंद्र, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ईसीआयएल, हैदाराबाद-५०००६२.
उपकरणांची सुरक्षितपणे माहिती देणाऱ्या व ती परत करणाऱ्या नागरिकांना संस्थेकडून योग्य बक्षीस दिले जाईल, तसेच उपकरणांच्या परतफेडीसाठी झालेला खर्चही परत केला जाईल. मात्र, उपकरणांशी छेडछाड झालेली आढळल्यास बक्षीस दिले जाणार नाही.
स्थानिक प्रशासनाला आवाहन:
स्थानिक प्रशासनाने ही महत्त्वाची माहिती तातडीने गावपातळीपर्यंत पोहोचवावी आणि स्थानिक भाषेत जनजागृती करावी, असे आवाहन TIFR, हैदराबादने केले आहे. पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात नियोजित असून, त्यासाठी सर्व आवश्यक तयारी त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



