बातम्या

महापालिका तोंडावर असताना जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; निलेश पाटलांचा ‘जय महाराष्ट्र’, अजित पवार गटाच्या वाटेवर?

पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून शहर सहसंपर्कप्रमुख पदाचा राजीनामा; वर्षभरापासून होते अलिप्त

जळगाव, दि. १६: महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच, जळगाव शहरात शिवसेना (शिंदे गट) पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून जळगाव शहर सहसंपर्क प्रमुख निलेश पाटील यांनी आपल्या पदाचा ‘जय महाराष्ट्र’ करत राजीनामा दिला आहे.पाटील यांनी आपला राजीनामा शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. पाटील यांच्या राजीनाम्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

वर्षभरापासून नाराजीनाट्य सुरू मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे गटामध्ये जिल्हाध्यक्ष पदावरून पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले होते. त्यावेळी निलेश पाटील यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आणि त्यांच्या जागी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली.या निर्णयानंतर निर्माण झालेल्या नाराजीनाट्यामुळे पाटील आणि भंगाळे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप देखील झाले होते.

सक्रीय राजकारणापासून होते अलिप्त पक्षाने त्यानंतर निलेश पाटील यांच्यावर जळगाव शहर सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. परंतु, हे पद मिळूनही पाटील हे गेल्या वर्षभरापासून पक्षाच्या मुख्य प्रवाहापासून आणि कार्यक्रमांपासून अंतर ठेवून होते.“सध्याचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे हे पक्षाचे कोणतेही कार्यक्रम किंवा बैठकांसाठी निरोप देत नाहीत, किंवा बोलावले जात नाही,” असा स्पष्ट आरोपही निलेश पाटील यांनी केला आहे. याच सततच्या दुर्लक्षितपणामुळे अखेर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

अजित पवार गटात प्रवेशाची शक्यता निलेश पाटील हे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) संपर्कात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ते लवकरच आपल्या समर्थकांसह पक्ष प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!