धरणगावच्या रणांगणात पालकमंत्र्यांची ‘मुलुख मैदान तोफ’ धडकणार! विरोधकांच्या गोटात खळबळ; जिल्ह्याचे लक्ष भाषणाकडे

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची आज (सोमवार) धरणगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावण्यापूर्वी शेवटच्या टप्प्यात भव्य जाहीर सभा होत आहे. महाराष्ट्र जनविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेली ही सभा, धरणगाव कोट बाजार येथे सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. ही केवळ राजकीय सभा नसून, जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारे एक शक्तीप्रदर्शन मानले जात आहे.
‘खान्देशची मुलुख मैदान तोफ’ म्हणून ओळखले जाणारे ना. गुलाबराव पाटील हे धरणगावमध्ये आज विरोधकांना ‘सडेतोड उत्तर’ देण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या या तोफेच्या धाकाने प्रतिस्पर्धी पक्षांच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे. स्थानिक प्रशासन, महसूल प्रक्रिया आणि विकासकामांच्या शासकीय तरतुदींचे सखोल ज्ञान असलेल्या पालकमंत्र्यांच्या भाषणात, शहराच्या विकासाची नेमकी दिशा आणि विरोधकांनी गेल्या काही वर्षांत प्रशासकीय पातळीवर केलेले ‘लॅपसेस’ कायदेशीर बाबींसह समोर येण्याची शक्यता आहे. “काहींच्या तोफा आज थंडावल्या असतील, परंतु आमच्या गुलाबराव पाटलांची तोफ आज धरणगावमध्ये धडकणार,” या त्यांच्या समर्थकांच्या घोषणेमुळे या सभेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
भव्य रॅलीने होणार आगमन
सभेपूर्वी सायंकाळी ४ वाजता शहरात महाराष्ट्र जनविकास आघाडीच्या उमेदवारांसह भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीद्वारे शहरभर संपर्क साधून मतदारांना आवाहन केले जाईल. या रॅलीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षिला जात असून, तीच सभेची पार्श्वभूमी तयार करेल.सायंकाळी ४ वाजता शहराच्या मध्यवर्ती भागातून भव्य प्रचार रॅलीद्वारे पाटील साहेबांचे धरणगाव शहरात आगमन होईल, त्यानंतर ६ वाजता कोट बाजार येथे जाहीर सभा होणार आहे.



