जळगावात ठाकरे गटाला महासुरुंग; ऐन निवडणुकीच्या तोंडावर युवा सेनेच्या ३०० कार्यकर्त्यांचा ‘जय महाराष्ट्र’
त्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश, जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ.

जळगाव : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडालेला असतानाच, जळगावच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. निवडणूक आयोगाने २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला निकालाची घोषणा करताच राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला जबरदस्त खिंडार पडले आहे.
ठाकरे गटाचे युवा सेनेतील खंदे समर्थक आणि महानगरप्रमुख यश इंद्रराज सपकाळे व गजू नरेंद्र कोळी (शहर प्रमुख)यांच्यासह तब्बल ३०० कार्यकर्त्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा ठाकरे गटासाठी अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे.
शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास
नुकताच बीड जिल्ह्यात अजित पवार गटाला धक्का बसल्याची घटना ताजी असतानाच, जळगाव जिल्ह्यातही राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवत हा प्रवेश करत असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या पक्षप्रवेशावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि महानगराध्यक्ष संतोष पाटील हेदेखील उपस्थित होते. आगामी काळात पक्षाचे संघटन अधिकाधिक मजबूत करू आणि जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढवू, असे आश्वासन यावेळी नवनियुक्त कार्यकर्त्यांनी दिले आहे.
प्रवेशाने शिंदे गटाला बळकटी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना झालेला हा सामूहिक प्रवेश शिंदे गटासाठी ‘बूस्टर डोस’ ठरणार आहे. या प्रवेशामुळे जळगाव शहरातील शिंदे गटाच्या संघटनेला मोठे बळ मिळाले असून, आगामी निवडणुकीत याचा थेट फायदा पक्षाला होणार असल्याचे बोलले जात आहे.
सर्वच राजकीय पक्ष सध्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, या स्थानिक निवडणुकीत ‘महायुती’ एकत्र लढणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे असतानाच जळगावातील या मोठ्या प्रवेशाने शिंदे गटाची बाजू मात्र भक्कम झाली आहे.



