स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2025 : जळगाव शहरासाठी आमदार राजूमामा भोळे यांची जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून निवड

जळगाव | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीला वेग आला आहे. या निवडणुकीत जळगाव शहरातील प्रचार व नियोजनाची जबाबदारी आमदार श्री. राजूमामा भोळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांची जिल्हा निवडणूक प्रमुख तसेच प्रभारी म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे जळगाव शहरातील निवडणूक लढाईला नवे समीकरण प्राप्त झाले आहे. राजूमामा भोळे हे लोकसंपर्कात अग्रेसर, तरुण कार्यकर्त्यांशी घट्ट नातं असलेले आणि संघटन बांधणीतील कुशल नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीची तयारी अधिक जोमाने पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जळगाव शहरातील राजकीय परिस्थिती, मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि संघटन रचना यांचा सर्वांगीण विचार करून ही जबाबदारी दिल्याचे समजते. भोळे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार नियोजन, उमेदवारांची निवड, बूथनिहाय संघटन बांधणी, मतदार संपर्क आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडणार आहेत.
या घोषणेनंतर शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाच्या सर्व पातळ्यांवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आमदार राजूमामा भोळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.पुढील काही दिवसांत निवडणूक नियोजन बैठकींना वेग येणार असून, पक्षाचा प्रचार आराखडा जाहीर करण्याची तयारी सुरू असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे.



