खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने जळगावात ‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ची सुरुवात!
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘शोध प्रकल्प स्पर्धेतून’ विज्ञान-तंत्रज्ञानातील नवे प्रयोग!

जळगाव, दि. १ (प्रतिनिधी): भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विकासाचे शिखर गाठत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या जनकल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने जळगावात ‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ या भव्य तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार स्मिताताई वाघ यांच्या विशेष पुढाकाराने आणि दिल्लीच्या ‘फ्रेंड्ज एक्झीबिशन अँड प्रमोशन’च्या वतीने हे प्रदर्शन सोमवार, दि. ३ ते बुधवार, दि. ५ नोव्हेंबर दरम्यान जळगावच्या शिवतीर्थ – जीएस ग्राऊंडवर रंगणार आहे. जळगावकरांना पहिल्यांदाच केंद्र-राज्याच्या योजनांची माहिती देणारी अशी अनोखी जनजागरण पर्वणी मिळणार आहे.
या प्रदर्शनाला जळगावकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन लोकप्रिय खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे आणि दिल्लीतील फ्रेंड्ज एक्झिबिशनच्या अखिला श्रीनिवासन यांनी शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

‘एक उन्नत राष्ट्र की ओर…’ हे घोषवाक्य:
दिल्ली येथील ‘फ्रेंड्ज एक्झीबिशन अँड प्रमोशन’ या संस्थेने केंद्र सरकारच्या जनजागरण मोहिमेअंतर्गत या प्रदर्शनाला मूर्त स्वरूप दिले आहे. संस्थेच्या संचालिका अखिला श्रीनिवासन यांनी प्रदर्शनाविषयी माहिती देताना सांगितले की, ‘एक उन्नत राष्ट्र की ओर…’ या घोषवाक्यासह भरविण्यात आलेले हे प्रदर्शन तिन्ही दिवस सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.
प्रदर्शनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन:
या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन साहेब यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील, केंद्रीय युवा व्यवहार व क्रिडा राज्यमंत्री मा. रक्षाताई खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. श्री. संजयजी सावकारे, तसेच आमदार राजूमामा भोळे, मंगेशदादा चव्हाण, अनिलजी पाटील, किशोरजी आप्पा पाटील, अमोलदादा पाटील, चंद्रकांतदादा सोनवणे, चंद्रकांतदादा पाटील आणि अमोलजी जॉवळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विविध विभागांचे माहितीपूर्ण स्टॉल्स:
खासदार स्मिताताई वाघ यांनी प्रदर्शनाबद्दल माहिती देताना सांगितले की, या प्रदर्शनात केंद्र आणि राज्यातील विविध विभागांच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टॉल्स असणार आहेत. यामध्ये कृषी आणि ग्रामीण विकास, जिऑलॉजिकल सन्व्हे ऑफ इंडिया, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, जैव सुरक्षा, आयुष, होमियोपॅथी अनुसंधान परिषद, केंद्रीय मत्स पालन विभाग, महाऊर्जा, भारतीय मानक ब्युरो, आयसीएमआर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, नॅशनल फर्लीलायजर लिमिटेड, भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI), इंडियन फार्मर्स फर्टिलायजर को-ऑपरेटिव्ह लिमीटेड (IFFCO), गुजरात इफॉर्मेटिक्स लिमीटेड, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD), न्यू इंडिया इन्शुरन्स, केंद्रीय गोदाम निगम, भारतीय समुद्री विश्वविद्यालय, केंद्रीय पेट्रोकेमिकल्स, भारतीय चहा बोर्ड, कृषी अधिकार सुरक्षा प्राधिकरण, भारतीय विमान प्राधिकरण, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास मंडळ, कर्नाटक सोप्स एंड डिटर्जेंटस् लिमीटेड, महाराष्ट्र बांबू, ओडीसा बांबू, आधार, जळगाव महापालिका, जळगाव जिल्हा परिषद, जळगाव जिल्हा प्रशासन आणि कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ-इनक्युबेशन सेंटर अशा विविध खात्यांचे आणि संस्थांचे माहितीपूर्ण स्टॉल्स नागरिकांसाठी उपलब्ध असतील.

जळगाव शहरात अशा स्वरूपाचे प्रदर्शन पहिल्यांदाच आयोजित होत असून, ते ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या त्रयींचा सुरेख संगम साधणारे आहे. त्यामुळे जळगाववासियांनी या ऐतिहासिक पर्वणीचा लाभ घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन सहभाग नोंदवावा, असे आवाहन खासदार स्मिताताई वाघ यांनी केले.
शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘शोध प्रकल्प स्पर्धा’:
या ऐतिहासिक प्रदर्शनाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी ‘शोध प्रकल्प स्पर्धा’ आयोजित करण्यात आली असून, जिल्ह्यातील जवळपास आठ शाळा आणि कॉलेजच्या मुलांचे प्रकल्प प्रदर्शनात मांडले जाणार आहेत. नव्या पिढीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कल्पक प्रयोगांचे प्रदर्शन या स्पर्धेतून होणार असून, विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष (जळगाव महानगर) मा. श्री. दिपक सूर्यवंशी, भाजपा जिल्हाध्यक्ष (पश्चिम) मा. डॉ. राधेश्याम चौधरी, फ्रेंड्ज एक्झीबिशनच्या संचालिका तथा प्रोजेक्ट हेड अखिला श्रीनिवासन, संचालक आनंद पाल, दीपकसिंग मेहता, साक्षी सैनी आदी मान्यवर उपस्थित होते.




