कासोदा पोलिसांची मोठी कारवाई: १९ किलो गांजासह तस्कर गजाआड

कासोदा (ता. एरंडोल) येथे गांजाची तस्करी रोखण्यासाठी कासोदा पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. १९ किलो गांजा व मोटारसायकलसह एकूण ₹२.८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
५ दिवसांचा सापळा, पोलिसांचे धाडसी मिशन
कासोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजा विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सपोनि निलेश राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मागील पाच दिवसांपासून संशयितांवर पाळत ठेवली. पहिल्या चार दिवसांत कोणतेही यश मिळाले नाही, मात्र २५ फेब्रुवारी २०२५ रोजी वनकोठे गावाजवळ संशयित इसम अजय रविंद्र पवार (वय २७, रा. सोनबर्डी, ता. एरंडोल) हा मोटारसायकलवरून गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
अटक आणि मुद्देमाल जप्ती
सदर आरोपी एरंडोलहून कासोद्याच्या दिशेने येत असताना पोलिसांनी सापळा रचला आणि त्याचा पाठलाग करून त्याला रोखले. त्याच्याकडील प्लास्टिकच्या गोणीमध्ये १९ किलो गांजा आढळून आला, जो खाकी रंगाच्या टेपने पॅक करण्यात आला होता. आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी गांजा व मोटारसायकल जप्त केली, ज्याची एकूण किंमत ₹२.८० लाख इतकी आहे.
NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल
पोहेकॉ नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधे व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS) अधिनियम १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मा. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पुढील तपास
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी:
- सपोनि: निलेश राजपूत
- पोउनि: दत्तू खुळे
- पोहेकॉ: नंदलाल परदेशी
- पोना: अकील मुजावर, किरण गाडीलोहार, नरेद्र गजरे
- पोकॉ: समाधान तोंडे, लहु हटकर
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि निलेश राजपूत करत आहेत.
— कासोदा प्रतिनिधी



