जळगाव महापालिका: भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब

विशेष प्रतिनिधी | जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, महायुतीमधील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युतीचा तिढा अखेर सुटला आहे. जळगाव शहराच्या विकासासाठी दोन्ही पक्ष एकत्र लढणार असून, जागावाटपाचा आणि सत्तेचा ‘फॉर्म्युला’ निश्चित झाला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. या निर्णयामुळे महायुतीतील कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर झाला आहे.
युतीचा निर्णय आणि बैठकीचा तपशील:
जळगाव मनपा निवडणुकीच्या रणनीतीसाठी आज एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत दोन्ही पक्षांतील प्रमुख नेते, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले की, “जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विरोधकांना नामोहरम करण्यासाठी भाजप आणि शिवसेना युती म्हणून सामोरे जाणार आहे. दोन्ही पक्षांच्या सन्मानाचे रक्षण होईल असा जागावाटपाचा ‘फॉर्म्युला’ आम्ही ठरवला असून, त्याची अधिकृत प्रसिद्धी लवकरच संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात येईल.”
दिग्गजांची उपस्थिती आणि राजकीय समीकरणे:
या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्ह्याच्या राजकारणातील प्रमुख नेते उपस्थित होते, ज्यामुळे या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण, पाचोरा आमदार किशोरअप्पा पाटील, पारोळा-एरंडोलचे आमदार अमोलदादा पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते.
तसेच, जळगाव मनपाच्या राजकारणातील अनुभवी नेते माजी महापौर नितीनभाऊ लढ्ढा,शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, दीपकभाऊ सूर्यवंशी आणि विशाल त्रिपाठी यांची उपस्थिती रणनीतीच्या दृष्टीने कळीची ठरली. नितीन लढ्ढा आणि स्थानिक नेत्यांच्या सहभागामुळे प्रभागनिहाय (Ward-wise) समीकरणे जुळवण्यात आणि बंडखोरी रोखण्यात नेत्यांना यश आल्याचे समजते.



