जळगाव महापालिकेत शिवसेनेचा ‘विजयाचा श्रीगणेशा’; आमदारपुत्र गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड!

जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने पहिला बिनविरोध उमेदवार निवडून आणल्यानंतर, आता शिवसेनेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माघारीच्या अवघ्या एक दिवस आधी नाट्यमय घडामोडी घडून शिवसेनेचे उमेदवार आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या विजयामुळे शिवसेनेने महापालिकेत आपला पहिला ‘विजयाचा श्रीगणेशा’ १ जानेवारी २०२६ या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अत्यंत थाटात केला आहे.
नेमकी घडामोड काय?
प्रभाग क्रमांक १८ (अ) हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव होता. या जागेवर शिवसेनेचे गौरव सोनवणे आणि मयूर चंद्रशेखर सोनवणे यांच्यात थेट लढत अपेक्षित होती. अर्ज छाननीच्या दिवशी दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने येथे चुरस निर्माण होईल, असे चित्र होते. मात्र, राजकारणाने अचानक वळण घेतले.
अन् मयूर सोनवणे यांनी घेतली माघार…
माघारीची अधिकृत मुदत संपण्यापूर्वीच, १ जानेवारी रोजी मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे गौरव सोनवणे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले.
शिवसेनेचा पहिला धमाका
आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र गौरव सोनवणे हे पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. पहिल्याच प्रयत्नात बिनविरोध निवडून येत त्यांनी शिवसेनेचा विजयाचा खाते उघडले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या यशामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून शहरात जल्लोष साजरा केला जात आहे.
”हा विजय केवळ शिवसेनेचा नसून मतदारांच्या विश्वासाचा आहे. १ जानेवारी २०२६ रोजी मिळालेला हा विजय येणाऱ्या महापालिका निकालांची नांदी आहे.”
— शिवसेना समर्थक



