जळगाव महापालिका रणसंग्राम: उद्या जळगावात ‘देवेंद्र’ लाट! महायुतीचं विराट शक्तीप्रदर्शन
मुख्यमंत्र्यांच्या 'हाय व्होल्टेज' रोड शोने विरोधकांचे धाबे दणाणणार!

जळगाव (विशेष प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीने आता अंतिम टप्पा गाठला असून, राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. महायुतीच्या प्रचाराचा तोफखाना आता थेट राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या हाती आला असून, उद्या मंगळवार, ६ जानेवारी रोजी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस जळगावात धडकणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भव्य ‘रोड शो’च्या माध्यमातून महायुती शहरात ऐतिहासिक शक्तीप्रदर्शन करणार असून, या ‘हाय व्होल्टेज’ दौऱ्यामुळे विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
भगवे वादळ घोंघावणार: जळगाव होणार ‘नमो’मय! भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख (जळगाव जिल्हा महानगर) मनोज भांडारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीच्या विजयाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री मैदानात उतरले आहेत. उद्या दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून या ऐतिहासिक ‘विजय संकल्प रोड शो’ला प्रारंभ होईल. या रॅलीत महायुतीचे सर्व ७५ उमेदवार, प्रमुख पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असून, संपूर्ण शहर भगवेमय होणार आहे.
🚩 रोड शोचा ‘झंझावाती’ मार्ग: मुख्यमंत्र्यांच्या या ताफ्याचा मार्ग शहराच्या मुख्य बाजारपेठेतून आणि व्यापारी संकुलांतून निश्चित करण्यात आला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांशी थेट संवाद साधता येईल.
-
प्रारंभ: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (दुपारी ३ वा.)
- नेहरू चौक
- लालबहादूर शास्त्री टॉवर
- चित्रा चौक
- गोलाणी मार्केट (शहराचे मध्यवर्ती केंद्र)
- समारोप: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा.
विकासाच्या मुद्द्यावर महायुतीचा ‘एल्गार’ “विकासकामांचा धडाका आणि विश्वासाचे राजकारण” या मुद्द्यावर महायुतीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आगमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, ‘अब की बार, महायुती सरकार’ हा नारा आता गल्लीबोळात घुमू लागला आहे. या रोड शोमध्ये ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणारे हे शक्तीप्रदर्शन जळगावच्या राजकीय इतिहासात नोंद घेण्यासारखे ठरणार आहे.
पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
जळगावकरांना आवाहन जळगावच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी आणि महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी या भव्य रोड शोमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे. उद्याचा दिवस जळगावच्या राजकारणात निर्णायक ठरणार, हे आता निश्चित मानले जात आहे.




