एटीएम कार्ड बदलून लाखोंची फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

जळगाव (प्रतिनिधी): एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांचे लक्ष विचलित करून, हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मोठे यश आले आहे. याप्रकरणी धुळे येथून एका सराईत भामट्याला रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याचा मुंबईतील सराईत साथीदार फरार आहे.
असा घडला होता प्रकार:
सविस्तर वृत्त असे की, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी जळगाव शहरातील बेंडाळे चौक परिसरातील एसबीआयच्या (SBI) एटीएममध्ये एक तक्रारदार नागरिक पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांचे लक्ष विचलित करून अतिशय हातचलाखीने त्यांचे मूळ एटीएम कार्ड बदलून बनावट कार्ड त्यांच्या हाती दिले. त्यानंतर या आरोपीने आणि त्याच्या साथीदाराने त्या मूळ कार्डचा वापर करून धुळे, नंदुरबार आणि मालेगाव येथील विविध एटीएममधून तब्बल २ लाख ३१ हजार रुपये काढून फसवणूक केली. याप्रकरणी जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३१८(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाचा वापर:
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तपासाचे आदेश दिले. गायकवाड यांनी तत्काळ वेगवेगळी पथके तयार करून तपासाला गती दिली. पोलिसांनी घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची अत्यंत बारकाईने पाहणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपींचे धागेदोरे धुळे येथे मिळाले.
धुळ्यात सापळा रचून आरोपीला बेड्या:
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी धुळे शहरात सापळा रचला. एटीएम सेंटरमध्ये पुन्हा दुसऱ्या नागरिकाला गंडा घालण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी शेख हबीब शेख नवाब (वय ५४, रा. लाला सरदार नगर, धुळे) याला शिताफीने ताब्यात घेतले.
मुंबईतील मास्टरमाईंडचा शोध सुरू:
अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी केली असता, या गुन्ह्यात त्याचा दुसरा साथीदार सैय्यद कमालुद्दीन खान (वय ३५, रा. साकीनाका, अंधेरी, मुंबई) हा सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो सध्या फरार आहे. विशेष म्हणजे या फरार आरोपीवर मुंबई आणि नवी मुंबई (कांदिवली, कामोठे, कळंबोली, वाशी, कापूरबावडी इ.) परिसरात फसवणुकीचे १० हून अधिक गंभीर गुन्हे आधीच दाखल आहेत. जळगाव पोलीस आता त्याचा कसून शोध घेत आहेत.
या पथकाने केली कारवाई:
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पो.हे.कॉ. प्रवीण मांडोळे, पो.हे.कॉ. संदिप पाटील, पो.हे.कॉ. हरिलाल पाटील, पो.हे.कॉ. राहुल बैसाणे, पोलीस अंमलदार राहुल कोळी आणि विलास गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.



