हळदीत नाचताना कमरेला लावला होता गावठी कट्टा; कासोदा पोलिसांची धडक कारवाई, जिवंत काडतूस जप्त

जळगाव: एरंडोल तालुक्यातील ताडे येथे एका हळदी समारंभात चक्क कमरेला गावठी कट्टा (पिस्टल) लावून बेधुंद नाचणाऱ्या एका तरुणाला कासोदा पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. या तरुणाकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, भर कार्यक्रमात शस्त्र घेऊन फिरण्याच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लखन प्रकाश वाघ (रा. परधाडे, ता. पाचोरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हळदीच्या कार्यक्रमात उडाला गोंधळ
सविस्तर वृत्त असे की, दिनांक ३ मे २०२६ रोजी एरंडोल तालुक्यातील ताडे गावात एका हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून अनेक पाहुणे मंडळी आली होती. त्यामध्ये पाचोरा तालुक्यातील परधाडे येथील लखन वाघ हा तरुणही उपस्थित होता. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हळदीच्या कार्यक्रमात बँडच्या तालावर वऱ्हाडी नाचत होते. लखन वाघ हा देखील नाचण्यात मग्न होता. मात्र, नाचताना त्याच्या शर्टाखालून कमरेला लावलेला एक गावठी कट्टा (अग्निशस्त्र) काही नागरिकांच्या निदर्शनास आला.

लग्नघरात शस्त्रासह तरुण पाहून नागरिकांची पाचावर धारण बसली. उपस्थित लोकांनी धाडस करून त्याला या शस्त्राबाबत विचारणा केली असता, आरोपी लखन याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि गर्दीचा फायदा घेत त्याने तिथून तत्काळ पोबारा केला.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून रचला सापळा
या गंभीर प्रकाराची माहिती तातडीने कासोदा पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, लखन वाघ हा पुन्हा ताडे गावात काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने कमरेला गावठी कट्टा लावून संशयास्पदरीत्या फिरत आहे.
भातखेडे चौफुलीवर ठोकल्या बेड्या
मिळालेल्या माहितीची खातरजमा होताच, कासोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) श्रीकांत पाटील यांनी लागलीच एक विशेष पथक तयार केले. या पथकाने भातखेडे चौफुली परिसरात सापळा रचला. काही वेळातच संशयित लखन वाघ त्या ठिकाणी येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी हे अवैध शस्त्र जागेवरच जप्त केले. आरोपी लखन वाघ याला कासोदा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो हे शस्त्र कोठून आणि का घेऊन आला होता, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
या पथकाने केली कारवाई
ही धडक कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) श्रीमती कविता नेरकर, आणि चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस अंमलदार निलेश गायकवाड, योगेश पाटील, आणि सोनू पाचुंदे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.



