खाकी वर्दीतील माणुसकी! ऑईलवर माती टाकून एपीआय योगिता नारखेडेंनी टाळला मोठा अनर्थ

जळगाव: पोलीस म्हणजे केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखणारे हात नव्हेत, तर संकटकाळी देवदूत बनून धावून जाणारी यंत्रणा आहे, याचा प्रत्यय जळगाव बायपासवर नुकताच आला. तरसोद फाट्याजवळ रात्री ११:४५ सुमारास अंधारात बंद पडलेल्या जेसीबीमधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ऑईल सांडले होते. या ऑईलवरून २-३ वाहने घसरल्याची (स्लिप) माहिती मिळताच नशिराबाद पोलीस स्टेशनच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) योगिता नारखेडे यांनी आपल्या पोलीस स्टाफसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः रस्त्यावरील ऑईलवर माती टाकून त्यांनी संभाव्य मोठा अनर्थ टाळला.

सविस्तर वृत्त असे की, जळगाव बायपासवरील तरसोद फाट्याजवळ रात्रीच्या अंधारात एक जेसीबी अचानक बिघाड होऊन बंद पडला होता. या बिघाडामुळे जेसीबीमधील ऑईल रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सांडले. बायपास रस्ता असल्याने या मार्गावर वाहनांचा वेग जास्त असतो. त्यातच रात्रीची वेळ आणि अंधार असल्यामुळे रस्त्यावर सांडलेले ऑईल वाहनधारकांच्या लक्षात येत नव्हते. परिणामी, या गुळगुळीत ऑईलवरून २ ते ३ दुचाकी घसरून अपघात झाल्याची घटना घडली.
रस्त्यावर ऑईल सांडले असून वाहने स्लिप होत असल्याची माहिती नशिराबाद पोलीस स्टेशनला मिळाली. माहिती मिळताच प्रभारी अधिकारी एपीआय योगिता नारखेडे मॅडम यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह थेट घटनास्थळ गाठले.
तिथे पोहोचल्यावर परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतर कोणत्याही यंत्रणेची वाट न पाहत बसल्यास मोठा आणि जीवघेणा अपघात घडू शकतो, हे ओळखून पोलिसांनीच पुढाकार घेतला. एपीआय योगिता नारखेडे आणि त्यांच्या सोबत असलेल्या पोलीस स्टाफने तातडीने रस्त्यावर सांडलेल्या ऑईलवर माती टाकण्यास सुरुवात केली.
केवळ आदेश न देता अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः कृती करत संपूर्ण ऑईल मातीने झाकून काढले. विशेष म्हणजे, केवळ माती टाकून पोलिसांचे काम थांबले नाही, तर रात्री तब्बल २:०० वाजेपर्यंत एपीआय योगिता नारखेडे आणि त्यांचा संपूर्ण पोलीस स्टाफ घटनास्थळी जातीने हजर होता. त्यांनी रस्त्यावर बंद पडलेला तो जेसीबी सुरक्षितरीत्या रस्त्याच्या बाजूला (साईडला) करून घेतला आणि रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा व सुरक्षित होईपर्यंत तिथेच थांबून कर्तव्य बजावले.
रात्रीच्या अंधारात स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्परतेने धावून जाणाऱ्या एपीआय योगिता नारखेडे आणि नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे हे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. “खाकी वर्दीमागे दडलेली माणुसकी” आणि कर्तव्याप्रती असलेली अपार निष्ठा त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे. त्यांच्या या समयसूचक कामगिरीमुळे अनेक निष्पाप वाहनधारकांचे जीव वाचले असून, या संवेदनशील पोलीस टीमला नागरिकांकडून कडक सॅल्युट केला जात आहे.



