भुसावळात एलआयसी एजंटचे घर फोडले; रोकडसह ७५ हजारांचा ऐवज लंपास
वरणगाव रोडवरील घटना; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी): शहरातील वरणगाव रोड परिसरातील पांडुरंग नाथ नगरात चोरट्यांनी एका एलआयसी एजंटचे बंद घर फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश करत, रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एलआयसी एजंट असून ते भुसावळ येथील वरणगाव रोडवर असलेल्या यशोदा हॉटेलच्या मागे, पांडुरंग नाथ नगर येथे राहतात. फिर्यादी आणि त्यांचे कुटुंब घराबाहेर असताना, चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी घराच्या आवारातील गेटवरून आत उडी मारली आणि मुख्य दरवाजाची कडी तोडून घरात अनधिकृत प्रवेश केला.
असा आहे चोरीस गेलेला मुद्देमाल: चोरट्यांनी कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त फेकून खालील ऐवज लंपास केला:
- रोख रक्कम: ६,००० रुपये.
- सोन्याचे दागिने: ४८,००० रु. किमतीची सोन्याची अंगठी (४.१७० ग्रॅम), ३,८०० रु. किमतीचे सोन्याचे मणी, ६,००० रु. किमतीची वापरती सोन्याची अंगठी, ७,००० रु. किमतीचे सोन्याचे कानातील वेल, सोन्याची नथ, फुली आणि म मंगळसूत्रातील वाटी.
- चांदीचे दागिने: १,५०० रु. किमतीची चांदीची पायल (३८.४०० ग्रॅम), २,५०० रु. किमतीच्या चांदीच्या दोन चेन, चांदीची अंगठी, जोडवे आणि ११ चांदीचे शिक्के.
एकूण ७४ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी एलआयसी एजंट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करीत आहेत.



