राजकारण

पाळधीत झळकले ‘भावी जिल्हा परिषद अध्यक्ष’पदाचे बॅनर!

कार्यकर्त्यांनी लावले थेट 'अध्यक्षपदा'चे बॅनर!

जळगाव/पाळधी: राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे होमपिच असलेल्या पाळधी गावात आज राजकीय वातावरणात एका बॅनरमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे ‘भावी जिल्हा परिषद अध्यक्ष’ असा उल्लेख असलेले बॅनर झळकल्याने जिल्ह्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

​पाळधी येथील एका उत्साही कार्यकर्त्याने हे बॅनर लावले असून, यावर प्रतापराव पाटील यांचा फोटो आणि ‘भावी जिल्हा परिषद अध्यक्ष’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आणि त्यासंबधीचे समीकरणे अजून जुळायची असतानाच, कार्यकर्त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

​प्रतापराव पाटील यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. युवा नेतृत्व आणि आक्रमक शैलीमुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. आता थेट त्यांच्या समर्थकांनी त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पाहण्याची इच्छा बोलून दाखवल्याने, येणाऱ्या काळात गुलाबराव पाटील काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​सध्या हे बॅनर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, विरोधकांसह स्वपक्षीयांमध्येही या ‘भावी’ घोषणेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे केवळ कार्यकर्त्यांचे प्रेम आहे की भविष्यातील मोठ्या राजकीय खेळीची ही नांदी आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!