गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची धडक मोहीम: बार आणि अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्सची अचानक झाडाझडती
पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वात 'सरप्राईझ चेकिंग';

जळगाव: कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलीस दलाने संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी विशेष ‘सर्च ऑपरेशन’ राबवले आहे. रात्रीच्या वेळी हॉटेल, बार आणि धाब्यांवर बसून गुन्ह्यांचे नियोजन करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार ही अचानक आणि मोठी कारवाई करण्यात आली.
अनेकदा गुन्हेगार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक रात्रीच्या वेळी बार किंवा धाब्यांवर एकत्र येऊन गुन्ह्यांचे कट रचतात, ही बाब लक्षात घेऊन जळगाव पोलिसांनी ही विशेष मोहीम आखली होती. दिनांक २ मे २०२६ रोजी रात्री ९:०० ते ११:०० या दोन तासांच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी ही मोहीम राबवण्यात आली. यासाठी सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी विशेष पथके स्थापन करून आपापल्या परिसरातील बार, हॉटेल आणि धाब्यांवर अचानक तपासणी सुरू केली.
मोहिमेअंतर्गत करण्यात आलेली प्रमुख कारवाई:
या विशेष ‘सर्च ऑपरेशन’मध्ये पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात एकूण २१३ हॉटेल आणि धाब्यांची कसून तपासणी केली. यामध्ये पोलिसांनी खालीलप्रमाणे कारवाया केल्या:
दारूबंदी कारवाई: अवैध दारू विक्री व सेवन प्रकरणी सर्वाधिक ११६ गुन्हे दाखल.
अवैध शस्त्र जप्ती: एका कारवाईत ०१ तलवार जप्त करण्यात आली.
एनडीपीएस (NDPS) गुन्हे: अमली पदार्थांसंदर्भात ०१ गुन्हा दाखल.
अनधिकृत हॉटेल: ०२ अनधिकृत हॉटेल निष्काशित (बंद) करण्यात आले.
प्रतिबंधात्मक कारवाई: कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ४७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई (कलम ११२/११७ प्रमाणे).
इतर कारवाया: एकूण १० कारवाया (मोटार वाहन कायद्यानुसार ५, ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत १ आणि इतर ४).
ही संपूर्ण कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) श्रीमती कविता नेरकर आणि अपर पोलीस अधीक्षक (जळगाव परिमंडळ) श्री. संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि अंमलदार यांनी अत्यंत प्रभावीरित्या या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, पोलिसांच्या या ‘ऑल आऊट’ कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धाबे दणाणले आहेत.



