जळगाव पोलिसांची धडक कारवाई! अवैध गोवंश वाहतूक व कत्तल प्रकरणी ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त; ७८ गोवंशाची सुटका

जळगाव: जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तल करणाऱ्यांवर जळगाव पोलीस दलाने मोठी धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या एका विशेष मोहिमेत तब्बल ६१ लाख ३३ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, कत्तलीसाठी जाणाऱ्या ७८ जिवंत गोवंशाची (गायी, बैल, गोऱ्हे व म्हशी) सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
३ दिवसांत २४ गुन्हे दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल ते २ मे २०२६ या कालावधीत जिल्ह्यात ‘महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम’ अंतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या तीन दिवसांच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी छापे टाकून आणि वाहनांची तपासणी करून तब्बल २४ कारवाया करण्यात आल्या. यात २५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधितांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, सुधारित अधिनियम २०१५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२५ अन्वये कठोर कलमे लावण्यात आली आहेत.
कारवाईची ठळक आकडेवारी:
दाखल गुन्हे (कारवाया): २४
आटक/गुन्हा दाखल आरोपी: २५
सुटका केलेले जिवंत गोवंश: ७८ (गायी, बैल, गोऱ्हे व म्हशी)
जप्त केलेले अवैध गोमांस: ४६३ किलो
जप्त वाहने: १४ वाहने (अंदाजे किंमत ४६,१०,०००/- रुपये)
गोवंश आणि मांसाची एकूण किंमत: १५,२३,२३०/- रुपये
कारवाईची एकूण उलाढाल (वाहने + गुरे + मांस): ६१,३३,२३०/- रुपये
या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झाली कारवाई
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, यावल, शनिपेठ, भडगाव, अडावद, पहूर, रावेर, चाळीसगाव शहर, चाळीसगाव ग्रामीण, मेहुणबारे, सावदा, एमआयडीसी जळगाव, एरंडोल, चोपडा शहर, कासोदा आणि पाचोरा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या कारवाया करण्यात आल्या आहेत. यात वाहनांमधून लपवून नेला जाणारा गोवंश आणि मोठ्या प्रमाणावर गोमांस जप्त करण्यात आले आहे.
गुन्ह्यातील वाहनांवर RTO कडूनही कारवाई
या गुन्ह्यांमध्ये अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली १४ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या सर्व वाहनांवर आता मोटार परिवहन विभागामार्फत (RTO) दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांचा कडक इशारा
जळगाव जिल्हाभरात गोवंश, गोमांस वाहतूक, विक्री आणि कत्तल करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कायद्याचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील अशा अवैध धंद्यांवर यापुढेही निरंतर आणि कडक कारवाई सुरू राहील, असा स्पष्ट इशारा जळगाव पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगाव परिमंडळाच्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर आणि जळगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.



